Sunday, 17 October 2010

शिवकल्याण राजा...

शिवकल्याण राजा...


निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी...

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा...

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी...

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले...

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली...

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे...

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा...

आनंदवन भुवनी...

आनंदवन भुवनी

स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवन भुवनी ॥१॥

त्रैलोक्य चालिल्या फ़ौजा, सौख्यबंध विमोचने
मोहीम मांडिली मोठी, आनंदवन भुवनी ॥२॥

येथुन वाढला धर्म, रमाधर्म समागमे
संतोष मांडला मोठा, आनंदवन भुवनी ॥३॥

भक्तांसी रक्षिले मागे, आताहि रक्षिते पहा
भक्तांसी दिधले सर्वे, आनंदवन भुवनी ॥४॥

येथुन वाचती सर्वे, ते ते सर्वत्र देखती
सामर्थ्य काय बोलावे, आनंदवन भुवनी ॥५॥

उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया
जपतप अनुष्ठाने, आनंदवन भुवनी ॥६॥

बुडाली सर्व ही पापे, हिंदुस्थान बलावले
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवन भुवनी ॥७॥

-समर्थ रामदास

This poem was written by Samarth Ramdas in the praise of Shivaji Maharaj.

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात..


“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥

- कुसुमाग्रज